जाऊ आनंदाच्या गावा - 8

हरीमाय 

आमचे दादा म्हणजे वडिलांचे वडील बन्सी रावजी विघ्ने. अतिशय बेरकी माणूस. अंगात प्रचंड ताकद, धिप्पाड शरीरयष्टी आणि अहोरात्र शिंदीवनात नशेत सुस्त मस्त जीवन जगणारी एक दिलदार आसामी!  पाटलाचे साहेबराव आणि आमचे दादा हे जिवलग मित्र शिंदीवनात यांची मैत्री सुरू झालेली ती शेवटपर्यंत टिकली. यांचे आहारशास्त्रही सर्वसमावेशक, अगदी बैलापासून ते मोरापर्यंत सर्वच प्राणीपक्षी यांच्या पोटाची आणि जिभेची हौस पूर्ण करणासाठी चालायचे.  एकदा भावकीच्या भांडणाचा राग मनात धरून यांनी एकजणांचा बैल कापून, शिजवून फस्त गेला असा किस्साही दादांनीच आम्हाला सांगितला होता. रावजीबुवांचा एकुलता एक वंशाचा दिवा असल्यामुळे जडणघडण तशी अतिशय बेफिकीरीत झालेली. आणि त्याचा परिणाम म्हणून बन्सीराव आणि वाद हे समीकरण गावाला मान्यच करून घ्यावे लागले. त्यावेळी गावाच्या पाटलाला सुद्धा यांनी कधी जुमानले नाही पाटलांसोबतसुद्धा मारामारी करून त्यांच्याही दहशतीला आव्हान देणारे हे गावातले पहिलेच गावकरी नंतर पाटलांच्याच नात्यातील मुलगी यांनी दुसरी धर्मपत्नी म्हणून घरात आणली ती म्हणजे आमची आजी हरीबाई. याचाही किस्सा वेगळाच होता, यांच्या सततच्या दारुड्या आणि आडदांड स्वभावाला कंटाळून माझी थोरली आजी तिच्या माहेरी म्हणजे पाडळीला निघून गेली काही दिवसांनी बन्सीराव तिला आणायला गेले पण त्यांनी परत सासरी पाठवण्यास साफ नकार दिला. मग काय बन्सीरावांनी निर्वाणीचा इशारा दिला, "पोरगी गपगुमान पाठवा नाहीतर दुसरी बायको करिन" पण धीट सासूबाई म्हणाल्या "तुमच्यासारख्या बेवड्याला कोण पोरगी देईल, दिली तं करा दुसरी पोरगी" हे ऐकल्यावर संतापलेल्या बन्सीरावांनी थोड्याच दिवसात साहेबरावाच्या नात्यातील सौतड्याची मुलगी लग्न करून घरी आणली. त्यानंतर मात्र थोरली आजी कधीच पुन्हा नांदली नाही. आपली लेकरबाळं भावाच्या दारात कशीबशी जगवली आणि लहानाची मोठी केली. आजही आमचे सावत्र चुलते पाडळीतच राहतात.

दुसरं लग्न होऊनही बन्सीरावांच्या वागण्यात काही फरक पडला नव्हता तीच बेफिकिरी आणि नित्यनेमाने शिन्दीवनात सुस्त पहुडने पण आमची दाखली आज्जी हरिबाई खास घरंदाज आणि खानदानी सानप कुटुंबातील. शिवाय तिला माहेरचाही भरभक्कम आधार असायचा. आमच्या ह्या दाखल्या आजीला ३ मुली आणि एकापाठोपाठ ६ मुलं झाली, नामदेव, तुकाराम, ज्ञानदेव, निवृत्ती, प्रल्हाद आणि महादेव अशी संतांची मांदियाळी जणू काय या वरवाड्यात जन्माला आली होती मुलींचीही नाव तशीच जनाबाई, हौसाबाई कौसाबाई, त्यावेळी भगवान बाबांचं कार्य त्या परिसरात फार मोठं चाललं होतं आणि त्यानेच प्रभावित होऊन आमच्या आजीनं यांची नावं अशी ठेवली असावीत कदाचित.. या सहा जनाची नावं जरी संतांची असली तरी काम मात्र सैतानाचंच अगदी बापासारखेच स्वभावानं तापट, भांडकुदळ वगैरे!नाही म्हणायला तेवढं शिंदीवनांचं वेड मात्र कुणाला नव्हतं. सगळीच  शरीरानं भक्कम आणि शेतात कष्ट करायलाही तितकेच मेहनती खोड्यातल्या शिंदी,शिंगटाच्या जाळ्या तोडून यांनी दादांनी नशेपायी पडीक टाकलेली जमीन साफसूफ करून घेतली जवळपास पन्नास एकर जमीन मशागत करून कसायला सुरु केली आणि भरभराटीचे दिवस आणले. तिकडे थोरल्या आजीला सुध्दा १ मुलगा आणि एक मुलगी असा १४ जणांचा भलामोठा परिवार सुखनैव नांदत होता. या सर्व भावंडानी आणि  भावकीतल्या सोनरावांनी मिळून एक भक्कम चिरेबंदी वाडा बांधला जमिनी घेतल्या आणि घरात सर्व सुखं, दूधदुभतं, तूप, लोणी, दही ताक, कोंबड्या, धनधान्य अगदी भरपूर! बारामाही कधीच कमी पडायचं नाही. दिवसामागून दिवस सुखात जात होते यांची सर्वांची लग्नेही झाली घरात सुना आल्या मोठा बारदाना वाड्यात नांदत होता. एवढ्या सर्वांचा स्वयंपाक, खाण पिणं आणि शेतातली कामं असं सामूहिक संसारगाडगं थोडीफार कुरकुर करत नेटाने चालायचं.

या सहा भावांची एकी एवढी चांगली असायची की गावातील कुणाचीही आमच्या वाड्यावर तिरपी नजर टाकायची हिम्मत होत नसे आणि आजही कुणी तेवढी हिम्मत दाखवत नाही. कालांतराने एक भाऊ आळंदीला घरातून रागारागाने निघून गेला आणि काही वर्षांनी परतला तो कीर्तनकार होऊनच! अखंड ब्रह्मचार्याची दीक्षा घेऊन आलेला प्रल्हाद पाहून आजीचा उर अभिमानानं भरून आला कारण आमची आजी वारकरी संप्रदायाची आणि पंढरीच्या पांडुरंगाची निस्सीम भक्त ! त्यांनतर मात्र सगळंच घरातलं वातावरण बदलत गेले दादांनी शिंदी आणि मांसाहार सोडून दिला बाकीच्यांनाही मांसाहार सोडून पवित्र तुळशीच्या माळा घातल्या. आणि घराची एक वैभवशाली छाप गावावर पडली. वडील ऊसतोड मुकादम त्या काळात लाखो रुपयांचे व्यवहार सांभाळायचे बाकी सर्वानी आमच्या वडलांना कारभारी म्हणून निवडलं होतं कारण व्यवहारचातुर्य हा गुण त्यांच्या ठायी होता.

आमच्या आजीचा एक नियम होता कि, दारात आलेला कुणीही विन्मुख परत जाऊ द्यायचा नाही शक्य त्या परीने त्याची मदत करायची त्यामुळे गावातील एकटेदुकटे गरीब शेतकरी, महार, मांग, चांभार, सुतार आणि इतर सर्वच बलुतेदार आजीला फार मानायचे. खळं चालू झालं या सर्व बलुतेदारांना त्यांचा वाटा इमानेइतबारे काढून ठेवणारी हरीबाईआजी रोजच्या रोज मांगवाड्यात ताकाचं गाडगं पाठवायलाही कधी विसरली नाही. रोज संध्याकाळी दारात  भाकरी मागायला येणारे गामजी मांग, माद्या मांग, महार या सगळ्यांना हरीमायचा मोठा आधार असायचा, पुढे ही परंपरा आमच्या वडलांनी आणि चुलत्यांनी टिकवून ठेवली ती आजतागायत चालू आहे. प्रत्येक गावात अशी उदार माणसं असल्यानं तर ग्रामसंस्था वर्षानुवर्षे टिकली, बहरली आणि आजही तग धरून आहे पण कोमेजलेल्या अवस्थेत. आजीच्या या संस्काराची बीजे एवढी खोलवर रुजली होती कि आमच्या घराने ४० वर्षे गावाच्या राजकारणात, समाजकारणात आणि जडणघडणीत सक्रिय भूमिका निभावली. १० वर्षे उपसरपंच आणि ९ वर्षे सोसायटीचे चेयरमनआणि सहकारी बँकेचं संचालकपद आमच्या वडलांनी भूषवलं अर्थात आजीची पुण्याई फळाला आली होती. मागील वर्षी मीही गावात पॅनल टाकून सरपंच पदाची निवडणूक लढली.आजीचा हा वारसा आता आम्हा भावंडाना पुढे चालवण्याची जबाबदारी फार मोठी वाटते.

क्रमश:

आमचे आजोबा: कै. बन्सी रावजी विघ्ने 



Comments

Post a Comment

Popular posts from this blog

जाऊ आनंदाच्या गावा - 2

जाऊ आनंदाच्या गावा - 1

जाऊ आनंदाच्या गावा - 9