जाऊ आनंदाच्या गावा - 6

खोडकर आणि खेळकर बालपण 

आमच्यात सर्वात जास्त चपळ आणि कुटाणेखोर असायचा तो म्हणजे प्रभू अण्णाचा हण्या आम्ही त्याला बप्पा म्हणत असू. याच्या मेंदूत सतत काहींना काही तरी नवीन शक्कल यायच्या. एकदा हा त्याच्या आजोळी सोनगिरीला गेला आणि एक नवीनच खेळ घेऊन आला, घोड्यावरचा राजा आणि पहिला प्रयोग केला तो बिचाऱ्या किरीमावरच. किरिमा म्हणजेच बळीराम त्याला करिष्मा म्हणता येत नव्हतं म्हणून तो किरिमा असं म्हणायचं पुढं हीच त्याची चीड पडली. महाराज म्हणून एकमुखाने किरिमाची निवड झाली सगळी वानरसेना महाराजांचा जयघोष करू लागली... महाराजांना घोड्यावर बसवण्यात आलं. महाराजांचा घोडा म्हणून आडदांड टूम्या महाद्याला वाकवण्यात आलं आणि महाराज डोळे मिटून घोड्यावर बसले. आता खरी गम्मत इथून पुढे ....  मला महाराजांच्या हातात तलवार द्यायचं काम सोपवलं होतं ती तलवार म्हणजे घाणीत बुडवलेली काठी! जिकडून बुडवली ती बाजू महाराजांच्या हातात द्यायची हे काम म्हणजे खरं तर मार   खायची पंचाईत म्हणून हण्याने मुद्दाम हे काम स्वतःकडे घेतले नाही. मी पटकन महाराजांच्या हातात ती गुशोभित तलवार दिली आणि लांबवर धूम ठोकली..... नंतर बळ्या हातात दगडं घेऊन दिवसभर मलाच शोधीत होता असं बाकीच्यांकडून समजलं.

भक्ता मामाने मला एक जुने सायकलचे टायर दिले होते त्या टायरला काठीने मारत संबंध गावभर मी पळवायचो. गण्या, हण्या, बाल्या, बळ्या आमच्या सगळ्यांकडेच टायरं होती पण पिल्याकडं मात्र राजदूत मोटारसायकलचं टायर होतं म्हणून तो जरा जास्तच भाव खायचा. मग खिशातलं काहीबाही खायला देऊन आम्ही पिल्याची मनधरणी करायचो. तोही मोठा डांबरट, एवढ्या सहजासहजी आम्हाला टायर खेळायला द्यायचा नाही मग आम्ही सगळे मिळून पिल्याला कच्चून मारायचो आणि टायर घेऊन पळून जायचो. संध्याकाळी पिल्याचं भांडण आमच्या घरी आलंच म्हणून समजा! पिल्याची घरची भांडणालाही मोठी खंबीर! यातून मी अनेकवेळा अक्काचा मार खाल्ला. पिल्याला मग आम्ही लालकुल्या अशी चीड पाडली(त्याचं कारण कधीतरी खाजगीत भेटल्यावर सांगेल) त्यावरून पुन्हा भांडण!
टायर 



फट्याच्या मचूकाकाचा गण्या मात्र लई चिडका! ह्याच्यावर राज्य आलं कि, हा घरी पळून जायचा आणि आमचा डाव मोडायचा. गण्या आम्हाला भांडणात आवारत नसे मग आम्ही त्याचे कान कचाकचा पिळायचो आणि गण्या वेदनेने मोठ्याने विव्हळायचा, राज्य देतो असं कबुल केल्यावरच आम्ही त्याचे कान सोडायचो. त्याच्यासारखाच किडक्या पण लई चिडकं खेळायचा, क्रिकेट मध्ये कितीही वेळा आऊट झाला तरी हा मान्य करायचाच नाही त्याच्या या स्वभावामुळं त्याचं आणि वानरसेनेचं कधी जमलंच नाही. पण किडक्याकडं बॅट आणि बॉल असल्यामुळं नाईलाजाने आम्ही त्याला सोबत खेळायला घ्यायचो.

वानरसेनेतील फट्याचा बाल्या आणि देवळ्याचा बाब्या अत्यंत चपळ, कुठल्याही झाडावर हे अगदी सरड्यासाखे पटकन चढायचे. एखाद्या घरावरून उडी मारून क्षणार्धात गायब व्हायचे त्यामुळे त्यांचा उपयोग आम्हाला खाऊ चोरण्याच्या मोहिमेत व्हायचा. हारतळ खेळताना बाल्या आणि बाब्या आपापली टीम वाटून घ्यायचे मग उन्हाळी पावसाळी (टॉस) झाल्यावर ज्या टीमवर राज्य आलंय त्यांच्यातला मार खायला एकजण आणि राज्य घेणाऱ्या टीमचा दम घालायला एकजण  असे शेजारी बसायचे. दम घालणे म्हणजे दीर्घ श्वास घेऊन श्वास संपेपर्यंत गळ्यावर लयबद्ध हाताची बोटं मारत आवाज काढायचा. अ................अ................अ................  असा तीनवेळा दम घालायचा आणि तोपर्यंत त्याच्या टीमने गावात लपण्यासाठी पसार व्हायचं. मग दुसरी टीम त्यांना शोधायला जायची. दुसऱ्या टीमला गुंगारा देऊन लपलेली टीम परत यायची आणि मार खायला बसलेल्याच्या हातावर सटासट मारायची मग त्याने मोठमोठ्याने ओरडून गडी SSSS आले SSSS रे ......... अशी जोरात आरोळी ठोकायची. त्यांच्यातला कुणीतरी हाती लागेपर्यंत डाव असाच चालू राहायचा. मार खाणाऱ्याचे मात्र हात लालेलाल व्हायचे. आमच्यात गण्याने आणि बुट्ट्या बाब्याने अनेकवेळा रडेस्तोवर मार खाल्ला.

गोट्या



आमचा दुसरा एक आवडीचा खेळ म्हनजे सुतळीच्या दोरीने बनवलेली एस. टी. बस. तारेच्या हुकाने उघडता येईल असा एक दरवाजा आणि पुढे ड्राइवर. मग सगळ्यांनी त्या दोरीच्या आतमध्ये येऊन एका रांगेत ह्या गल्लीतून त्या गल्लीत पळायचं.  याव्यतिरिक्त अनेक वेगवेगळे खेळ आम्ही दरदिवशी खेळायचो, गोट्या, विटीदांडू, काठिकोट, कब्बडी, लंगडी, लगोरी, शिवाशिवी, आणि मारामारीही.

विटीदांडू 



Comments

Popular posts from this blog

जाऊ आनंदाच्या गावा - 2

जाऊ आनंदाच्या गावा - 1

जाऊ आनंदाच्या गावा - 9