जाऊ आनंदाच्या गावा - 2
गावरान सकाळ
आमचा वाडा भल्या पहाटे कावळ्यांच्या सभेने जागा होई, वाडयासमोर असलेल्या मोहनदादांच्या मोकळ्या जागेत एक जुनाट कडुनिंबाचे झाड होते त्यावर फांद्यांच्या दुबेळक्यात काटक्यांची घरटी थाटून असलेले हे कावळे सर्वात अगोदर जागे होत. खरं तर कावळा हा पक्षी म्हणजे प्राणिसृष्टीत सर्वात पहिला जागा होणारा पक्षी ! आणि सोबत आपल्या बांधवांनाही जागा करतो, आणि त्यांच्यानंतर मग जागी होते अवघी जीवसृष्टी. गावाकडची सकाळ सुरु होते ती नानाविविध पक्षाच्या किलबिलाटाने,विधात्याने मुक्त हस्ताने स्वरांची उधळण केलेले कोकीळ, भारद्वाज, चिमण्या, कारंडव, काक म्हणजे स्वर्गीय गंधर्वच जणू ! त्यांच्या सोबतीला सहगायकाची भूमिका निभावणाऱ्या भ्रमर आणि मधुमाश्यांचा गुंजारव दिव्य संगीताची अनुभूती देणारी असते . आणि या सगळ्यात एखाद्या पारिजातकाच्या फुलाने आपल्या सुवासाची दरवळ वाऱ्याच्या झुळूकेबरोबर मिसळून वातावरनात अजूनच प्रसन्नता आणावी. आकाशात गुलाबी, लालसर, तांबट रंगाच्या ढगांची पूर्व दिशेला चाललेली दाटीवाटी आणि त्यातुन उंचच उंच भरारी घेणारा पक्षिराज गरुड पाहून असं वाटतं जणू काही हा त्या ढगांना पांगवण्याचा केविलवाणा प्रयत्नच करतोय. सकाळी सकाळी निळ्याभोर आकाशाला गवसणी घालणाऱ्या बगळ्यांच्या फुललेल्या माळा तर मला दूरदेशीचे प्रवासीच वाटतात, सकाळची आन्हिक आटोपून वाऱ्यावर स्वार होऊन ही मंडळी जगाला कवेत घ्यायला निघालेत कि काय ? त्यातच चिऊताईंची अंगणातील दाणे टिपताना चाललेली चिव-चिव आणि मरगळ झटकून गळ्यातील घंटीचा किणकिणाट करत हंबरणारी गायी वासरं ! अवघी सजीवसृष्टीच सूर्यनारायणाच्या आगमनासाठी सज्ज होतेय इतकं सुंदर वातावरण सकाळचं असत अगदी चैतन्यमय आणि ऊर्जेने पुरेपूर भरलेलं. खरंच किती सुंदर असते सकाळ ! ! चैतन्याने ओतप्रेत भरलेली. टवटवीत,मंगलमय अगदी प्रसन्न !! दिवसभराची ऊर्जा त्या सकाळच्या वातावरणातून मिळते . खरंच सकाळ म्हणजे ईश्वराची सुंदर निर्मिती एक नाविन्याचा अविष्कार, मोरपिसाच्या अर्कानं ओतून काढलेलं निळशार आकाश, पण हे पाहण्याचे भाग्य सकाळी १० नंतर उठणाऱ्या पिढीला कसं मिळणार?
अशा या भल्या सकाळी मग आमच्या वाड्यातील स्रियांची लगबग सुरू व्हायची, चुलीला पोचारा देणे , शेणाचे सारवण, बाहेर अंगणात शेणाचा सडा टाकून त्यावर एखादी छान रांगोळी काढून वाडा शुचिर्भूत करायच्या. मग स्नानं आटोपून घरातील वडीलधारी मंडळी देवपूजा सुरु करायची आणि देवघरातून आलेला चंदनमिश्रित अगरबत्तीचा सुवास संपूर्ण वाड्यात दरवळायचा. अंगणातल्या तुळशीला पाणी घालणाऱ्या स्रिया आणि दूर कुठूनतरी भूपाळीचे कानावर येणारे स्वर वाड्याला एक नवीन ऊर्जात्मक स्वरूप आणायचे . हा वाडा म्हणजे जणू काय या भल्या मोठ्या कुटुंबाचा पितामहाच असावा ! सगळे त्याच्या दिमतीला सकाळीच हजर ! आणि ते योग्यही होते म्हणा १०-१२ कुटुंबाना आपल्या कुशीत सामावून घेणारा हा वास्तुपुरुष आमच्या कुटुंबाचा पितामहच नव्हता काय ?
आम्ही भावंड साखरझोपेत असताना आक्का(माझ्या आईला आम्ही आक्का म्हणतो, तेव्हा मम्मी नावाचं फॅड आलं नव्हतं) आम्हाला बळेच उठून बसवी, थोड्या वेळाने आम्ही परत उबदार गोधडीत शिरायचो. दुसऱ्या वेळी मात्र मग फटके आणि 2-3 गावरान खरपूस शिव्या सोबतीला मिळायच्या. शेवटी नाईलाजाने कुरकुर करत आम्ही उठायचो. आणि तडक मळ्यातल्या चिंचेकडे धावायचो, हिवाळ्यात सकाळी वारं काहूर सुटलेले असले की, चिंचेच्या पाडाची मेजवानी भरपेट मिळायची. सदऱ्याच्या, आणि पॅन्टच्या खिशात ते चिंचेचे गोडसर आंबट पाड भरून परत घरी यायचो. जास्त पिकलेल्या चिंचेला छोटेसे भोक पाडून त्यात दूध भरायचं आणि थोड्या वेळाने त्याचं चिंचयुक्त दही बनायचं. आयुष्यात मी बनवलेली चिंचेच्या अकोल्यात पहिली कुल्फी. हा फॉर्म्युला मात्र लहानपणीच छान जमतो बरं!
आमच्या वाड्याचे भग्नावशेष
मग घरी आल्यावर बळजबरी अंघोळ घातली जायची, कसेबसे कपडे घालून डोक्यावर खोबरेल तेल थापून आम्ही परत हनुमान मंदिराकडे धूम ठोकायचो.
त्यावेळेसचं गावातील हनुमान मंदिर हे लाकडी खणात बनवलेले माळवद होते. मध्ये हनुमान आणि बाजूला विठ्ठल रखुमाई च्या मूर्ती गावाच्या वैभवात श्रद्धेची भर घालायच्या. माझे आजोबा हे उत्तम पखवाजवादक, वामनभाऊंच्या तालमीत्त तयार झालेले अत्यंत श्रद्धाळू टाळकरी ! गावात भल्या सकाळीच रामायणाची फेरी असायची, गावातील वारकरी, टाळकरी हरिनामाचा जयघोष करीत संपूर्ण गावच त्या टाळ मृदूंगाच्या तालावर लयबद्ध करून सोडायचे. फेरी संपल्यावर साखरशेंगदाण्याचा प्रसाद मिळतो म्हणून आम्हीही शेवटी शेवटी दिंडीत गुपचूप शिरायचो. खरं सांगतो त्या साखरशेंगदाण्याच्या प्रसादाची चव प्रसिद्ध लोणावळा चिक्कीला सुद्धा नाही. कालौघात आता ती प्रभात फेरीही बंद झाली आणि प्रसादातला तो गोडवाही संपला.शेवटी फेरी मंदीरा समोर आल्यानंतर गावातील सर्व स्रिया आरतीचे ताट, ताजी फुलं, प्रसाद घेऊन मंदिरासमोर गर्दी करायच्या. सामूहिक आरती झाल्यानंतर प्रसाद वाटप व्हायची आणि मग सर्वजण आपआपल्या घरी परतायचे.
मंदिरातल्या आरतीनंतर प्रत्येकजण न्याहारी आटोपून आपापल्या कामाला जायचा, गोठ्यातून गुरं सोडून डोंगरात चरायला नेणारे गुराखी, शेळ्या मेंढ्यांचे शिस्तबद्ध संचालन आणि त्यांचे रखवालदार चार पाच पाळीव कुत्री रस्त्याने धुराळा उडवीत निघत . त्यांच्या पाठोपाठ आपल्या खुराने रस्तावरची माती उडवत, गायी बैलांचा आणि म्हशींचा एकमेकींना अंग घासनारा, शिंग खटखटविणारा,हंबरणारा नाना रंगाचा एक प्रचंड चैत्यन्याचा तांडाच तांडा कमानी शेपट्या उभवून हंबरत गोमय आणि गोमूत्राचं विसर्जन करीत रवाना व्हायचा, त्यांच्या घंटानादाने पूर्ण गावच रिकामे व्हायला सुरु व्हायचे. १० वाजेपर्यंत पूर्ण गाव रिकामे व्हायचे आणि मग देवळाच्या पडवीत ८-१० म्हातारी पत्ते खेळत बसायचे आणि आमची चिमुकली पोरांची वानरसेना गावात दिवसभर उनाडक्या करायला मोकळी !!
क्रमशः
सुंदर सकाळ ......


वा मित्रा! छान लिहीलंस, लहानपणात घेवून गेलास. आपण हे लहानपण जगलोय, आता हे शक्य नाही. तूझ्या लिखाणामुळे परंत ते जगता आलं. मन:पुर्वक धन्यवाद.
ReplyDeleteव्यक्त होत रहा। छान लिहीतोस
ReplyDeleteखूप खूप धन्यवाद, सार्थक झालं
ReplyDeleteखूप छान वर्णन केले बापु ...👍
ReplyDeleteThanks Vishnu
DeleteChan lihile ahes. Gavakadchya athvani jaga zalya.
ReplyDeleteThanks mitra
Deleteबाप्पू खुप छान वर्णन केलस सत्य परस्तीती वर आता ते दिवस नाही येऊ शकत 👌
ReplyDeleteAprateem bol
ReplyDelete