जाऊ आनंदाच्या गावा - 7
शाळेतला पहिला दिवस
प्रत्येक गोष्टीच एक वय असतं आणि त्याचे अर्थही प्रसंगानुरूप लावले जातात. पोरगी वयात आली म्हणजे इथे वेगळाच शृंगारिक अर्थ वगैरे किंवा पोराचं वय निघून चाललंय इथंही भलताच काळजीचा अर्थ, आता वय झालं ! इथं निराशावाणा अर्थ, या वयात तुम्हाला हे शोभतं का?असा टोमानवजा अर्थही वयोमानावरून काढता येतो शेवटी काय तर मराठीचे बोल कौतुके।।आता आमचंही वय शाळेत घालण्याजोगं झालं होतं एवढ्यासाठीच वयाची इतकी ऐशीतैशी !! आणि मग याच वयाचा दाखला देऊन एके दिवशी घरच्यांनी शाळेत नाव घालायचं असं ठरवलं. मग काय आनंदाचे डोही आनंद तरंग आपण शाळेत जाणार म्हणजे नवे कपडे, अनवाणी पायाला एक नवी कोरी पॅरागॉनची चप्पल आणि दप्तर, पाटी पेन्सिल असं सर्वच नवीन मिळणार. शिवाय रोज संध्याकाळी घरी जेवणानंतर कविता, बाराखडी म्हणून दाखवल्यावर सगळेच कौतुक करणार आणि आपण काहीतरी वेगळे आहोत याचा अनुभव अगदी बालवयातच, पुढे जाऊन काही त्याला अहंकार म्हणून वाढवतात तर काहीजण आत्मविश्वास! पण व्यक्तिमत्वाची बीज अशाच छोट्या मोठ्या गोष्टीतून पेरली जातात बरं लहानपणात!
आमच्या सवंगड्याचीही नावं शाळेत घातली जाणार होती, किडक्या, शेपाळ्या, मुंगळ्या, पक्या आणि अजून बऱ्याचजणांना पहिलीसाठी प्रवेश मिळणार होता.
आमच्या सवंगड्याचीही नावं शाळेत घातली जाणार होती, किडक्या, शेपाळ्या, मुंगळ्या, पक्या आणि अजून बऱ्याचजणांना पहिलीसाठी प्रवेश मिळणार होता.
मग एके दिवशी एक पाटी, पेन्सिल, वायरच्या(नायलॉन) पिशवीचे दप्तर, सचित्र बालमित्रचं पुस्तक, एक पांढरा टेरिकोटचा सदरा आणि खाकी हाफ चड्डी हे सर्व आमचे आप्पा सोमवारच्या बाजारातून घेऊन आले फक्त चपल मात्र तेवढी विसरले! मी. दुसऱ्या दिवशी शाळेत गेलो तेव्हा मला "डावा हात डोक्यावरून घेऊन उजवा कान पकड" असं फर्मावलं गेलं. माझा हात कसाबसा पुरला आणि शाळेतल्या प्रवेशाचा अधिकृत मार्ग मोकळा झाला. मग मास्तरांनी एका जुनाट हिरव्या पानांच्या रजिस्टरवर काहीतरी लिहिलं आणि मला वर्गात बसायला सांगितलं.
आमची शाळा म्हणजे पत्र्यांची चार-पाच खोल्या असलेली चौथीपर्यन्त वर्ग असलेली जिल्हा परिषद आणि गावकऱ्यांनी लोकवर्गणीतून बांधलेली गोंडस इमारत(नंतर सानप सरांच्या प्रयत्नांनी ती सातवी पर्यंत झाली). शाळेला समोर एक छोटीशी पडवी. एक डेरेदार वटवृक्षाचे झाड आणि समोर प्रशस्त फरसबंदी पटांगण, पूर्व दिशेला ग्रामपंचायत कार्यालय, पश्चिम दिशेला हनुमान मंदिर. आणि मध्ये आमची शाळा. शाळेच्या पत्र्याला असणाऱ्या भोकातून सूर्यकिरण थेट खालच्या फरशीला भेटायला यायची! त्या सूर्यकिरणांच्या कवडश्यात असंख्य रंगीबेरंगी धूलिकण नाचतगात नुसती खालीवर पळापळ करायची , काही दिवस तर मी केवळ याचं निरीक्षण करण्यातच घालवायचो, मला तर कधीकधी हे धूलिकण म्हणजे अंतराळातले ग्रह तारे वगैरे या कवडश्यातून चोरून आमच्या शाळेत शिकायलाच आलेत कि काय असं वाटायचं. पण पावसाळ्यात मात्र या भोकातून पाणी गळल्यावर त्याचा तिटकारही यायचा.
शाळेच्या आठवणी ह्या कधीच कुणीही विसरू शकत नाही कारण हा आठवणींचा अनमोल ठेवा असतो आणि प्रत्येकजण आपल्या हृदयात तो जतन करून ठेवत असतो. प्रत्येकाची शाळा ही वेगळी असते, कुणी खेड्यातील जिल्हा परिषदेच्या शाळेत शिकलेला, कुणी म्युनिसिपालिटीच्या शहरी शाळेत शिकलेला तर कुणी कॉन्व्हेंट इंग्लिश मेडिएम च्या शाळेत शिकलेला. पण प्रत्येकासाठी शाळा यापेक्षा फार वेगळी असते. फक्त धमाल मस्ती, मनसोक्त हुंदडणे आणि अजून बरंच काही मजेदार!! शाळा म्हणजे समुद्राच्या लाटांचा तरंग, गोल गोल गिरक्या की अजूनच काही?? ........ पण शाळा म्हणजे आयुष्याच्या पहाटेला पडलेलं एक गंमतीदार नितळ आनंद देणार चिरतरुण स्वप्न कधी न विसरणारी आठवण!!
माझे प्रार्थमिक शिक्षण हे माझ्याच गावातील जिल्हा परिषदेच्या मराठी शाळेत झाले माझा शाळेतला पहिलाच दिवस असल्याने मी वर्गात अंग चोरून बसलो होतो, वरच्या वर्गातील पोरांचा रुबाब काही तरी औरच! तेव्हा 1ली आणि 2 री चे वर्ग एकत्र बसायचे. थोड्या वेळाने घंटा वाजली आणि सर्वजण बाहेर फरशीवर पळाले म्हणून मीही पळालो. सर्वजण आपापल्या वर्गाप्रमाणे रांगा धरून उभे राहिले. मीही 1ली च्या रांगेत येऊन उभा राहिलो. सावधान..... !!! .....विश्राम......!!! इतरांचे बघून आम्ही हातापायाची एक शिस्तबद्ध केविलवाणी हालचाल केली. मग जन गन मन सुरू झाले आम्ही फक्त स्वर लावला कारण शब्द आम्हाला महितच नव्हते राष्ट्रगीताचे! पण आपण ओठांची फक्त हालचाल केली तरी समोरच्याला वाटेल की आम्हाला राष्ट्रगीत येतंय हा आमचा निरागस समज. राष्ट्रगीत संपले मग प्रार्थना 'भारत माझा देश आहे' त्यानंतर सर्व जण खाली बसले आणि गीतगायन सुरू झाले' ।खरा तो एकचि धर्म, जगाला प्रेम अर्पावे।' बाळू आणि विश्वनाथ ह्या तिसरीतल्या वर्गातल्या हुशार पोरांनी ते गाणं गायलं होतं. मग 2 रीतल्या राजेंद्र आणि राम यांनी ' ।बलसागर भारत होवो । ' ह्या गाण्यावर सूर धरला.
आम्ही कधीकधी शाळेआड लपून हा परिपाठ बघायचो पण आज प्रत्यक्ष अनुभव घेत होतो. शेवटी सरांनी एक बोधकथा सांगितली आणि नवीन पोरांना आपला परिचय करून द्यायला सांगितला. मव्ह नाव हण्या!, म्या पक्या! असा प्रत्येकजण आपापली नावं सांगत होता आणि सर मध्येच ओरडून मव्ह नाही माझं म्हण! अशी दुरुस्ती करायचे. मला ताईने नाव सांगायला शिकवलं होतं त्यामुळे मी माझं नाव व्यवस्थित सांगितलं त्यावेळी सानप सरांची आणि माझी नजरानजर झाली पण मी पटकन खाली पाहिले. सर्व पाहिलीतल्या पोरांनी आपली नावं सांगितली आणि नंतर सगळीकडे एक भयमुक्त शांतता पसरली........ कारण सानप सरांनी "काल शाळेत न आलेले उठून उभे राहा " असा धारदार आणि गंभीर आवाजात आदेश सोडला. तो आवाज माझ्या काळजात एक अनामिक भीती आणि धाक निर्माण करून गेला. आजही सानप सरांसमोर उभं राहायची भीती वाटते. काही पोरं/पोरी चरफडत खालमानेने उभी राहिली. तोपर्यंत कुणीतरी बेशरमीचे ओलेे फोक आणून सरांच्या पुढ्यात ठेवले होते. फाट S S फाट S S असे आवाज मनावर भीतीचा डोंब उसळल्यागत आघात करत होते. एक दोन पोरं तर चक्क चड्डीतच मुतली... . खरं तर ह्या मारापायी अनेक पोरांनी शाळाच सोडून दिली होती. मग शिक्षेचा सोहळा संपल्यावर पसायदान झाले आणि आम्ही निमूट वर्गात जाऊन बसलो.
मागच्या वर्षी आम्ही सर्व बालमित्रांनी एकत्र पैसे जमा करून शाळेची डागडुजी केली आणि छानपैकी शाळेला रंगही दिला शेवटी आमची एक सुंदर आठवण आहे ती!
मागच्या वर्षी आम्ही सर्व बालमित्रांनी एकत्र पैसे जमा करून शाळेची डागडुजी केली आणि छानपैकी शाळेला रंगही दिला शेवटी आमची एक सुंदर आठवण आहे ती!
क्रमशः

Comments
Post a Comment