जाऊ आनंदाच्या गावा - 9
गावगाडा
भारतात ग्रामीण संस्कृती जितकी समृद्ध होती तितकी कुठल्याच देशात बहुधा नसावी किंबहुना नव्हतीच इतरत्र. ज्यावेळी पाश्चिमात्य देशात रानटी संस्कृती जोर धरत होती त्यावेळी हिंदुस्थानातील गावे वेदघोषाने जागी व्हायची आणि कीर्तनाने आत्मतृप्त होऊन निद्राधीन व्हायची. स्वयंपूर्ण खेडी, कृषी आधारित अर्थव्यवस्था आणि बाराबलुते अठरापगडजातींनी भरलेले गाव, कित्येक चांगल्या वाईट परंपरा इथे जन्माला आल्या नंतर काही लुप्त झाल्या आणि काही टिकल्याही. त्यातल्या त्यात पूर्वीचे निबिड अभयारण्य आणि सध्याच्या मराठवाड्यात तर सतत आक्रमणं,लढाया अगदी कृष्ण देवरायापासून किंवा शालिवहनाच्या शासनकाळापासून ते अलीकडील मराठे, निजाम आणि नंतर स्वतंत्र भारत या सर्व संक्रमणाच्या काळात मराठवाड्याच्या ग्रामीण संस्कृतीवर मोठा परिणाम पाहायला मिळतो.
या सर्व कठीण, अतिकठीण किंवा सुकर काळात आमच्या गावानेही अनेक प्रसंग आपल्या पोटात सामावून घेतले पण आम्हाला मोजकेच माहित आहेत एवढंच. पूर्वीचे आनंदगाव म्हणजे बहुतेक २०० वर्षांपूर्वी नक्की काळ सांगता येणार नाही पण जुन्या जाणत्या माणसाकडून ऐकायला मिळाले त्याप्रमाणे लांबवर ढग्या डोंगराच्या पायथ्याला जंगलात वसलेले होते आजही तिथे जुन्या खुणा सापडतात. त्याकाळातील मातीची भांडी, वडाखालच मारुती मंदिर आणि जुन्या बांधकामाचे काही शिल्लक अवशेष! या जुन्या आनंदगावच्या खुणा इतिहासात घेऊन जायला पुरेशा आहेत. पण आमचं गाव काय हडप्पा मोहोंजोदडो वगैरे नसल्यामुळे आणि ओबढधोबड दगडगोट्यात, पिचलेल्या, रंजल्या, गांजल्या लोकांची काय ती संस्कृती असणार आणि तिथे काय इतिहास सापडणार असा सरकारी कयास लावून तिथे काही संशोधन वगैरे प्रकार झालेले नसावे वगैरे वगैरे हे आपलं माझं स्वतःच मत! पण अचानक अखे गावच्या गावच का रिकामे झाले असावे, गावात राहणारी मूळ लोक कोण होती आत्ताची विघ्ने आडनावाची आमची लोक की इतर दुसरे कोणी? अशी असंख्य प्रश्न डोक्यात नाचायला लागतात पण मेंदूला कोणतेच तर्कवितर्क लावता येत नाहीत, बरं मी कुणी आर्कियॉलॉजिस्ट वगैरे पण नाही, आणि आता काही नवीन आर्कियॉलॉजीचा कोर्स वगैरे करण्याचं धारिष्ट्य पण करवत नाही. छे! मग कसा शोध लावणार बरं काहीतरीच आपलं! जाऊ द्या. एखाद्या म्हाताऱ्या माणसाला विचारून पाहू असा शेवटचा मेंदूतून निघालेला तर्क मला गावातील म्हाताऱ्या माणसाकडे नेतो पण ही म्हातारीसुद्धा भलतीच विचित्र! मूळ मुद्दा सोडून भलतंच काहीबाही सांगत बसतात उदाहरणार्थ यांच्यातल्या कुणीतरी भुताशी कुस्ती खेळलेलीच असते नाहीतर निदान मग पदुआईच्या तळ्याच्या पलीकडून सात कढया सोनं अन त्यावर फिरणारा काळ्या रंगाचा नाग, हा किस्सा ऐकायलाच लागतो , 'मग आम्ही आपलं बोअर होऊन इकडे तिकडे बघायला लागलो कि,, ते जाऊदे, परमिसर अन्नाच्या बापानी सगळ्या चिचखिळ्याला कशी पोवळ घातली आणि त्यातच एका पराध्यान कसं सोनं लपवून ठेवलं आणि ते नंतर गायब झालं. हि तरी कथा ऐकवणार छ्या!! छ्या!! या म्हाताऱ्याकडून काय आपल्याला इतिहास कळणार? आपण उठणार एवढ्यात, इतका वेळ कोपऱ्यात निवांत बिडीचे थोटकं चघळत बसलेल्या विठू देवळ्यानं आम्हाला जुन्या आनंदगावची गोष्ट सांगितली ती अशी कि,
"आपण मूळ विघ्नेच अन आपल्या सगळ्या कुळाची मायबी एकच आधी आपुन ढग्या डोगंराच्या पलीकडून राहायचो, मंजीच आत्ताची विघनवाडी नंतर दुष्काळामुळं ढग्याच्या अल्याडल्या अंगाला राहायला आलो मंजीच जुनं आनंदगाव मंजीच वागदरवाडी" - विठू देवळे
" बरं मग जुनं आनंदगाव का सोडलं दादा?" - आम्ही
"अरे बाबड्या तिथंबी लई लांडगी, जनावरं आणि निसताच डोंगूर म्हणून मंग सगळे सपईला आले" - विठू देवळे
. म्हणजे नव्या आनंदगावला का? - आम्ही
हा असंच आम्हाला आमचे वाडवडील सांगायचे.- विठू देवळे"आर तव्हा काय जमिनी कुणाच्या नावावर व्हत्या का काय, धरील त्याची अन धरील तेवढी जमीन त्याचीच"! वयस्कर पाटलांनी मध्येच खुलासा केला. पाटलांच्या या वाक्यांनी मोहनदादा मात्र कसनुसा चेहरा करून निघून गेला. धरील त्याचीच जमीन हे पाटलाचं वाक्य आणि मोहनदादानी बारीक तोंड करून मनातले उचंबळून आलेले कढ दाबत निघून जाणं मात्र आम्हा पोरांच्या समजण्याच्या पलीकडचं होतं.
असं वर्षानुवर्षे गावगाड्याच्या कारभार चाललेला, जन्माला आलोत म्हणून देवानं मरण देईपर्यंत कसबसं जगायचं अशा थोर तत्वाची ही मागासलेली, गंजलेली ओबडधोबड राकट शरीराची माणसं, कुणाच्या शेतजमिनी एका बिडीवर लुबाडलेल्या तर कुणाच्या पायलीभर बाजरीवर नाहीतर एका बैलावर!
शेवटी काय तर, धरेल त्याची आणि धरेल तेवढी जमीन त्याचीच - इति... पाटीलतत्वपण तरीही हि माणसं याच गावात राहत होती उरल्या सुरल्या जमिनीच्या तुकड्यावर आणि मोलमजुरीवर रानातल्या फांदीच्या भाजीवर, बरड्याच्या भाकरीवर दिवस काढायची पण मेली नाहीत ,जगणं महत्वाचं होत कारण देवाने अजून मरण कुठं दिलं होतं? सकाळी कुणाच्यातरी बांधावरून जनावरांसाठी गवात कापून आणायचं, कुणाच्या तरी विहिरीवर पाणी भरायचं, टाकून बोलले तरी निर्ढावलेपणाने तसंच ऐकूण घ्यायचं आणि उसण अवसान आणून बळंच हसायचं. यांच्यापेक्षा जास्त वाईट अवस्था बलुतेदारांची.. , कुणी कितीही टाकून बोललं अस्पृश्यता मानली तरी तसंच लापटासारखं जीवन कंठत राहायचं, कारण देवाने अजून मरण कुठं दिलं होतं? वर्षानुवर्षे हेच गावगाड्यात चाललं होतं फक्त आनंदगावच्या नाही तर सर्वच गावगाड्यात. पण हे सर्व आघात, अपमान गिळूनसुद्धा यांनी कधी गाव सोडलं नाही आणि यामुळंच गावं टिकून राह्यली आणि स्वयंपूर्ण झाली. यांच्या कष्ठाने आणि मेहनतीनेच शिवारात टपोरे कणसं जोम धरायची मग ते शेत कुणाचंबी असो पण कष्ट खरे यांचेच आणि त्याबदल्यात खळ्यात दाणे काढल्यावर मिळणार १-२ पायल्याच बलुतं हाच यांचा वर्षाकाठचा जमाखर्च.
आमच्या गावात खालच्या अंगाला महारवाडा, मांगवाडा, चांभारवाडा म्हणजे जवळपास वेशीबाहेरच, मग खालच्या आळीला बामण, नेहरकर, अप्पाजी पाटलाची वंशावळ, वरच्या आळीला बप्पाजी पाटलाची वंशावळ, आमचा वरवाडा, देवळे, काळे आणि वाटाच्या पलीकडून बांगर खाली पांदीच्या पलीकडून सानप अशी अनेक आडनावाची आणि अठरापगड जातीजमातीची लोकं गावात राहायची. सानप तागडवातुन आणि काही सौताड्यातून स्थलांतरित होऊन आलेली बांगर साक्षाळ पिपरीतून आणि विघ्ने मात्र मूळ कि स्थलांतरित? जुन्या आनंदगावचे. तरीही मूळ कसं काय? च्यायला! आपणही स्थलांतरितच कि, जुन्या आनंदगावरून म्हणजेच वागदरवाडीतून आलेले, हा प्रश्न विठू देवळ्याला विचारायचा राहूनच गेला.
क्रमश:

Comments
Post a Comment