जाऊ आनंदाच्या गावा - 3
आमची वानरसेना आणि धर्मा तात्या
आमची उपद्रवी वानरसेना मात्र खूप छान जमली होती, गण्या, बाल्या, हण्या, गोपी, संदीप, बळ्या, दिड्या, संत्या(मी स्वतः), बाब्या,नित्या, सोम्या, बुट्टा बाब्या, मल्ह्या, नाऱ्या, मन्या, राज्या, राम्या, संज्या, आवड्या , बाळ्या अशी अनेकजण आमच्या सेनेचे पराक्रमी सदस्य होते. आमची टोपणनावं(चिडवायची नाव) पण फार मजेदार होती, किडक्या, शेपाळ्या, तटक्या, किरीमा, शेम्बड्या, बुट्ट्या, भटग्या, नान्या, शामल आणि अजून बरीच.....
वानरसेना .........
गावातील लोकं रानात गेल्यावर आम्ही गावात उरलेली वानरसेना साधारण ४ ते ५ वर्षे वयोगटातील कार्टी सुशीला काकींच्या बालवाडीत जाऊन सुकडी किंवा खिचडी खाऊन परत देवळा समोर जमा व्हायचो. आणि कोणता खेळ खेळायचा कि रानात हुंदडायला जायचं की अजून काही करायचं यावर गोंधळ / गोंगाट सुरु करायचो ,आमच्या या गोंगाटाच्या आवाजाने वैतागलेली देवळात पत्ती खेळणारी म्हातारी हातात काठी घेऊन आमच्या मागे मारायला धावायची, पण कुणीही हाती लागत नसे, कचक तुटलेली आणि ठिगळं जोडलेली हाफ चड्डी एका हाताने सावरून धरत आमची वानरसेना चिंगाट पसार व्हायची. मग सर्वानुमते देवळातल्या म्हाताऱ्याना वैताग द्यायचा असा निर्णय व्हायचा. मग मंदिराच्या घंटेला दोरी बांधून ती लांबून वाजविणे ,एखाद्या गाढ झोपलेल्या म्हाताऱ्याच्या कानात किंवा नाकात कडूलिंबाची काडी घालून गुदगुल्या करणे असा वैताग देण्यात आमचा हातखंडा असायचा. वृद्धापकाळाने थकलेली बिचारी म्हातारी शिव्या देण्याशिवाय काही एक करू शकत नव्हती. खरं तर अस्सल गावरान शिव्यांची दीक्षा आम्हाला त्या देवळातील म्हाताऱ्यांकडूनच मिळाली.नाईलाजाने मग शेवटी देवळातील म्हाताऱ्यांसोबत आमचा एक तह व्हायचा आणि त्यांच्या खिशातील नारळ, गूळ किंवा इतर काही खाण्याच्या वस्तू ते आम्हाला देऊन मंदिरातून हुसकून लावायचे.
देवळातून हुसकावल्यावर आमची रिकामटेकडी वानरसेना आपला मोर्चा मग धर्मा तात्या काळे यांच्या दुकानाकडं वळवायची. त्यांचं दुकान गावाच्या शेवटच्या टोकाला आणि तेही दिवसभर चालू असायचं. एका जुनाट खिळपाट आणि मातीने लिंपलेल्या जीर्ण घरात धर्मा तात्यांचे किराणा मालाचे दुकान असायचे; दुकानात अगदी फळांपासून ते तेला मिठासहित सर्व वस्तू मिळायच्या. कळकट पांढरा सदरा, आतुन दुहेरी कोपरी, डोईवर केशरी रंगाचा फेटा, अस्ताव्यस्त वाढलेल्या दाढीमिशा आणि सदैव रागीट आणि रापलेला चेहरा. वयाची सत्तरी उलटून गेलेली पण हातात अद्यापही काठी नाही की कधी आजारी नाही. तात्यांना देवादिकांचाही फार नाद ! सतत तोंडात अभंग ओव्या आणि चिडले तर प्रसंगी खरपूस शिव्याही अशी जिभेवर संमिश्र सरवस्तीची कृपा लाभलेली ! तोंडात सतत काहीतरी चघळत असावेत अशी जबड्याची सतत हालचाल चालू असायची. धर्मा तात्या कुठेही असोत त्यांच्या बंडीच्या खिशातच ते अर्ध दुकान घेऊन फिरत, बर्फी, लेमन गोळ्या, काचेच्या गोट्या, गाय छाप, स्टार, गोवा, बम्बई, दिल्लगी, धनाडाळ, मिठा मसाला असं जवळपास एक चालतं फिरतं दुकानच धर्मतात्याच्या खिशात असायचे.
आम्ही धर्मा तात्यांच्या दुकानात जायचो तर खरं पण आमच्या खिशात फार फार तर 10 किंवा 20 पैसे असायचे अन खाणारी तोंड 10-12. मग काय? धर्मा तात्याच्या वृद्धपणाचा फायदा घेऊन हळूच पुढ्यात ठेवलेली पोंग्याची पिशवी, बर्फी, चॉकलेट असं हळूहळू लांबवायचं. खाऊ चोरी करण्याची पण आमची एक खास पद्धत होती, समोर चारपाच जणांनी गर्दी करून उभा राहायचं आणि एकाने त्यांच्या पायातून हात घालून सफाईदार पणे मोहीम फत्ते करायची यात आमचा बालू आणि किरिमा फार पटाईत ते एवढ्या हात चलाखीने चोरी करायची कि आम्हालाही कळायच नाही यांनी मोहीम फत्तेसुद्धा केली म्हणून ! एकदा तर प्रभू अन्नाच्या हाण्याने हद्दच केली रात्रीच्या वेळी अंधाराचा फायदा घेत धर्मातात्याला 1 रूपयाची नोट लांब दोरीला बांधून दिली आणि चार बरफ्या फस्त केल्यावर थोडे आडबाजूला जाऊन हातातील दोरी ओढायला सुरू केली. इकडे दुकानात बसलेल्या तात्यांनी नोट वरच्या खिशात ठेवली होती, आणि खिश्याची गुंडी लावून घेतलेली. खिशाला झटका का बसतोय हे काय तात्यांच्या लक्षात येईना इकडे हणमंतरावांचा मात्र जोरात प्रयत्न चालू होता नोट परत मिळवण्याचा. शेवटी सर्व प्रकार धर्मा तात्याच्या ध्यानात आला दोरीचा मागोवा घेत भिंतीआड लपलेल्या हण्याला तात्यांनी रंगेहाथ धरलं. ते पाहून लांबवर थांबलेली आमची उपद्रवी सेना वाट सापडन तिकडं चिंगाट पळून गेली. त्याच्या घरी भांडण गेलं,आणि त्याला घरच्यांनी धु धु धुतला, पण कितीही मार खाल्ला तरी बाकीच्यांचे नावं सांगायची नाहीत हा अलिखित नियम होता आमचा. त्यामुळे आम्ही बाकीचं वाचलो. (नंतर आम्ही धर्मातात्यांच्या दुकानातील बर्फीची एक आख्खी बरणी चोरून बदला घेतला, सोडतो की काय आम्ही?). अशा अनेक मोहिमा आमच्या वानर सेनेने फत्ते केल्या, कधी गोट्यांची बरणी पळवली तर कधी चॉकलेटची पिशवी लंपास केली; कदाचित त्यांना चोरी केलेली माहितही होत असे पण जाणीवपूर्वक दुर्लक्ष करायचे कि काय कोण जाणे !
धर्मातात्या आता हयात नाहीत आणि त्यांचं किराणा मालाचे दुकानही ! पण त्यांच्या दुकानातील चार आण्याची बर्फी आणि २ रुपयाच्या ४० पोंग्याच्या पिशवीची चव अजूनही जिभेवर रेंगाळते. काही माणसं बाहेरून जरी विचित्र आणि काटेरी भासत असली तरी आतून मात्र गोड असतात, अगदी पिकलेल्या फणसासारखीच त्यांपैकीच धर्मात्यात्या ! बालपणीच्या आठवणीत धर्मातात्या आमच्या सर्वच बालमित्रांच्या सदैव आठवणीत राहाल कायमस्वरूपी !!
क्रमशः
स्वर्गवासी धर्मा तात्या


Comments
Post a Comment