माझी आक्का


आज जागतिक स्तरावर मातृदिन साजरा केला जातो. त्याग, समर्पण आणि निस्वार्थ प्रेमाचा हा अखंड झरा म्हणजे आई. 


माझ्या आईला आम्ही सर्व आक्का म्हणतो, गावात सगळे तिला आक्काच म्हणतात. स्वभावाने जरा तापट, बोलण्यात फटकळ, अडाणी पण तितकीच प्रेमळ, कष्टाळू साक्षात तुकाराम महाराजांची जिजाबाईच जणू.

आम्ही लहानापासून अक्काचं कष्ट बघत आलोत. आमच्या घरची परिस्थिती जेमतेमच असल्याने आमच्याकडे गॅस, टीव्ही, पंखा असलं नावालासुद्धा नव्हतं त्यामुळे सकाळी चुलीला पोचारा द्यायचा, आडावरून शेंदून पाणी आणायचं, चूल पेटवून चहा करायचा, मग स्वयंपाक, वडील गावपुढारी असल्याने घरी माणसं भेटायला येत मग पुन्हा चहा, रोज 30-40 कप चहा झाल्याशिवाय चुलीवरचं भगूलं कधी खाली उतरलं नाही. ऊन वर आल्यावर आक्का भाकरी बांधून पाटी डोक्यावर घेऊन रानात जायची. ऊन, वारा, पाऊस याची तमा न बाळगता शेतात काम करत राहायचं. संध्याकाळी दिवेलागणीला पुन्हा घरी यायचं, पुन्हा चूल पेटवायची,  पावसाळ्यात सरपण ओलं झाल्याने चूल पेटता पेटत नसायची मग कधी चुलीला तर कधी आम्हाला शिव्या देत देत कशीबशी आक्का चूल पेटवायची.


आमची आक्का देवीची खूप मोठी भक्त आहे, गावच्या आराधी मंडळीत आक्काची गाणी खूप लोकप्रिय आहेत. आजही आक्का एकही गाण्याचा कार्यक्रम सोडत नाही.


मी किर्तनकार व्हावं अशी आक्काची फार इच्छा होती, मी भगवानगडावर वारकरी संप्रदायाच्या प्रशिक्षणासाठी गेलो तेव्हा आक्काला आभाळभर आनंद झाला होता. मला गडावर लागणाऱ्या खर्चासाठी आक्का मोलजुरी करून पैसे पुरवायची. पण सुदैवानं मी आक्काचं हे स्वप्न पूर्ण न करता उच्चशिक्षणाची वाट धरली आणि सॉफ्टवेअर इंजिनिअर झालो. पण आक्काला आजही वाटतं मी महाराज व्हायला पाहिजे होतं. आक्का म्हणते मोठा महाराज झाला असतास तर महिन्याला 2-3 लाखापेक्षा कीर्तनात रोज तेवढे कमिले असतेस. आमच्याकडे वारकरी संप्रदाय पुण्य कमावण्यापेक्षा पैसा कमावण्याचा मोठा स्रोत आहे.


मी लहानपणी खूप कामचुकार होतो. उदाहरणार्थ जर मला शेळी सांभाळायला दिली तर मी तिला एकाच जागेवर बांधून पोहायला जायचो. त्यामुळे आक्काच्या खास ठेवणीतल्या शिव्या मला संध्याकाळी जेवणाअगोदर मिळायच्या कधी कधी फक्त शिव्याच मिळायच्या. उदा. "तुला चावला तीन लहऱ्याचा साप, तुह्या पडला मानाचा कळूस न आला महार बातमी घेऊन" पण यात "कडूच्या पोटच्या" म्हणल्यावर अप्पाला कुणास ठाऊक लई राग यायचा.


आक्काला शिक्षणाचं एवढं महत्व कधी वाटलं नाही, तिला वाटायचं बाकीचे पोरं रानात राबतात, म्हशी, गुरं सांभाळतात तसं आपल्या पोरांनीबी कणाकणा काम करावा दणादणा संसार करावा. पण सुदैवानं आम्ही अक्काचं तेही ऐकलं नाही आणि शिक्षण पूर्ण करत राहिलो.

नंतर आक्काला शिक्षणाचं महत्वही पटलं, उदाहरणार्थ "संजूला लै शिकवून मोठा साहेब करायचा म्हंजी निसत्या हुंड्यात बंगला बांधून होईन".


मागच्या वर्षी मी आक्काला आणि अप्पाला हौसेने विमानप्रवास घडवून आणला. शहरातील मॉल, बंगले, उंच इमारती, माणसं, बदलतं जग हे मी आक्काला मुद्दाम दाखवतो. काहीही न समजावता हळूहळू आक्काने हा सामाजिक, सांस्कृतिक बदल आत्मसात केला जग किती मोठंय हे आक्काच्या लक्षात येतंय, आता आक्काला हे पटतंय की शिक्षणच महत्वाचे आहे, हुंड्यापेक्षा माणसं चांगली पाहिजेत. गाईम्हशी वळणारे एक अख्खी पिढी प्रगतीपासून वंचित ठेवतात याची खात्री आक्काला झाली.


सर्व गावातील भोळ्याभाबड्या, कष्टकरी मातांना मातृदिनानिमित्त साष्टांग दंडवत....!


#happymothersday

Comments

Popular posts from this blog

जाऊ आनंदाच्या गावा - 2

जाऊ आनंदाच्या गावा - 1

जाऊ आनंदाच्या गावा - 9