जाऊ आनंदाच्या गावा - 5

बालवाडी आणि वानरसेना


अजून शाळेत नाव घातलं नसल्यामुळे आम्हाला फक्त बालवाडीतच प्रवेश असायचा. आमची बालवाडी म्हणजे सिमेंटच्या भिंतीवर पत्र्यांच्या छताची गावातील एक पक्की इमारत. इमारतीत एक वजनकाटा, धुराने काळवंडलेले मोठे पातेले, एक लांब पळी आणि एक चुलांगण, खाली फरशी आणि भिंतीवर विविध चित्रे आणि पोस्टर्स. बालवाडीत येताना प्रत्येकाने घरून आपापली ताटवाटी घेऊन यायची आणि एका रांगेत बसायचं असा सुशीला काकींचा शिरस्ता असायचा. सुशीला काकी प्रचंड कडक शिस्तीच्या आणि रागीट तर मंगल काकी मात्र शांत स्वभावाच्या. सुशीला काकींनी आता बालवाडी सोडली पण मंगल काकी अजूनही मुलांसाठी खिचडी बनवतात. खिचडी शिजायला वेळ असला कि, सुशीला काकी आमच्याकडून कसली तरी गाणी आणि बाराखड्या मोठ्याने म्हणून घ्यायच्या, आम्हीही इतरांच्या सुरात सूर मिसळून ओरडायचो. पण आमचं लक्ष मात्र कोपऱ्यात मांडलेल्या भल्यामोठ्या चुलंगणावरील पातेल्याकडेच. मंगल काकी जाळ फुकून फुकून बेजार झाल्या कि मग आमच्यातल्याच दोन-चार आडदांड पोरांना बारीक काटक्या गोळा करून आणायला पाठवायच्या.

बालवाडीच्या पाठीमागे भलं मोठं थोरलं वडाचं झाड होत अनेक फांद्या आणि पारंब्यांनी भरलेलं हे झाड बारमाही थंडगार सावली द्यायचं. झाडावर अनेक पक्ष्यांची घरटी असायची, कावळे, पारवे, पोपट आणि अनेक रानपाखरं घरट्यात किंवा ढोलकीत राहायची. हा अजस्र वटवृक्ष  म्हणजे एक छोटसं पक्षीनगरच होत जणू, संध्याकाळी पक्षी आपल्या घरट्यात आल्यावर तर नुसता कल्लोळ उठायचा. दरवर्षी नागपंचमीच्या सणाला वडाला अनेक झोके बांधले जायचे, उंचच उंच झोके, काही खुजे तर काही छोट्या फांद्याला बांधलेले. सणाला माहेरी आलेल्या लेकीबाळी, लहान मुलं दिवसभर झोका खेळायची. वटपौर्णिमेच्या दिवशी तर वडाचा मोठाच थाट असायचा, सुवासिनी सातजन्म हाच पती मिळावा म्हणून वडाच्या झाडाची पूजा करायच्या, अनेक प्रकारची फळं, नैवद्य वडासमोर मांडायच्या (नंतर आम्ही आणि झाडावरील पक्षी ती फळं हळूच पळवायचो, त्यातल्या त्यात लबाड कावळे जरा जास्तच घाई करायचे). त्याच्या अंगाखांद्यावर उत्साहात झोका खेळणाऱ्या लेकीबाळींचा, मनोभावे पूजा करणाऱ्या सुवासिनींचा, तो कोण होता? आजोबा, थकलेला बाप कि आजन्म मौन बाळगलेला एखादा थोर ऋषी की रात्रीच्या वेळी भयाण पिशाच्चासारखा भासणारा दुसरा कुनीतरीच वेताळ वगैरे. छे! पण आमच्यासाठी तर हा जिव्हाळ्याचा आमच्यातलाच एक सवंगडी, त्याच्या दाढीसारख्या वाढलेल्या पारंब्याचा आधार घेत आम्ही वर चढायचो, सगळ्याफांद्यावर यथेच्छ बागडायचो. कुठल्या पक्षाची किती पिल्लं जन्माला आलीत आणि कुठल्या घरट्यात किती अंडी आहेत याची आम्हाला खडानखडा माहिती असायची पण आम्ही कधीही पक्षांना त्रास दिला नाही एक कावळे सोडले तर! कारण कावळ्यांचा आणि आमचा कधीच विचार पटला नाही. झाडावर चढलं कि एकतर त्यांची कर्णकर्कश काव-काव सुरु व्हायची, किंवा आमच्या डोक्यात ते चोच तरी मारायचे. मग कावळे आणि वानरसेना यांच्यात एक अघोषित युद्ध सुरु व्हायचे. बराच वेळ कावळ्याबरोबर युद्ध खेळून झाल्यावर मग आम्हाला काकीने काटक्या आणायला पाठवलंय याची आठवण व्हायची. वडाखाली अनेक बारीक सारीक काटक्या, पक्षांची मोडलेली घरटी आणि वाळलेल्या फांद्या पडलेल्या असायच्या.आम्ही त्याच काटक्या गोळा करून आणूनकाकीला द्यायचो. पातेल्यात शिजलेली चवदार, खमंग खिचडी आणि गोड सुकडी खाऊन झाल्यावर आम्ही बालवाडीतून धूम ठोकायचो ते थेट मारुतीच्या मंदिराकडेच !

मारुतीचं मंदिर म्हणजे वानरसेनेच एकत्र जमण्याचे ठिकाण ! लाकडी खणाच्या माळवादात बनवलेली मंदिराची वास्तू आणि समोर जुनाट कडुनिंबाच्या झाडाचा पार ! देवळ्याच्या बाबूचे घर देवळापुढेच असल्यामुळे आपापल्या वाट्या त्याच्या घरात ठेऊन रांजनातलं पाणी भरपूर प्यायचो आणि पुन्हा पारावर यायचो. देवळापुढं राहत असल्यामुळे त्यांच्या भावकीला देवळे अशी खेल पडली होती. जरा वेळाने मग परभू अण्णाचा हन्या एका खिशात भूईमुगाच्या शेंगा आणि दुसऱ्या खिशात बाजरीच्या पापड्या घराच्या सलदातून चोरून घेऊन यायचा आणि आम्हा सगळ्यांना वाटायचा. शेंगा पापड्या फस्त केल्यावर मग लपाछपी खेळायला सुरु करायची. हडेल s s s s हाप्प  s s s s करून हातचे टाकायचे आणि ज्याच्यावर राज्य येईल त्याने वडाच्या झाडाला शिवून परत सगळ्यांना शोधायला यायचं. आम्ही जमेल तसं लपायचो, कुणी देवळामागं तर कुणी शाळेच्या बोळीत ! मग बळ्या इष्टाप...... गण्या इष्टाप ........ असे एक एक करत राज्य आलेल्याने गडी शोधायचे पण मध्येच जर कुणी पाठीमागून येऊन धप्पा घातला तर पुन्हा राज्य पुन्हा वडाच्या झाडाला शिवून यायचं. असं बराच वेळ खेळून दमल्यावर मग सर्वजण आपापल्या घरी जेवायला जायची ते परत देवळापुढं जमा होण्याच्या बोलीवर!

सगळे शेतात गेल्यावर, दुपारी घराला कुलूप असायचे आणि आमची भाकरी अंगणातील झाडाला एका फडक्यात बांधून ठेवलेली आणि रांजणावर पाणी पिण्यासाठी तांब्या ठेवलेला. फडक्यात बाजरीची भाकरी, त्यावर आंब्याचं खारवलेलं लोणचं आणि काऱाळ्याची किंवा जवसाची तेलमिश्रित चटणी असा आमचा दुपारचा लंचबॉक्स! पण आम्ही त्याला भाकरीच म्हणायचो कारण भाकरीपलीकडे काही वेगळं लंचबॉक्समध्ये असतं हे आम्हाला माहीतच नव्हतं, सणावाराला गोडधोड व्हायचं पुरणपोळ्या वगैरे !पण नियमित आहारात फक्त भाकऱ्याच. जर आमची भाकरी नसेल तर आम्ही चिम्याच्या आईने ठेवलेल्या भाकरी चिम्या यायच्या अगोदर चोरून खायचो. एकदा आमची चोरी पकडल्यावर चिम्याने लै डोकं फोडून घेतलं होतं अगदी खोच पडेपर्यंत तेव्हापासून आम्ही त्याच्या भाकरी चोरून खायचा उद्योग बंद केला. मग जवळच्या शेतात एखाद्या गुराख्याची झाडाला बांधून ठेवलेली भाकर खा, नाहीतर मग म्हाताऱ्या धर्मातात्याचं दुकान तर ठरलेलंच!

आज सर्व काही आहे उत्तम बॅट बॉल विकत घेऊ शकतो इतर खेळाचे साहित्य घेऊ शकतो पण बालपणीच्या खेळाचा आनंद काही औरच!! परमानंद की ब्रम्हानंद ? पण तो यापेक्षाही काहीतरी वेगळाच आनंद होता. आजही आठवलं की असं वाटतं देवाला सरळ सांगावं काळाचे ठोके जरा 20 वर्षांपूर्वी घेऊन जा आणि सोड आम्हाला नेऊन तिथे परत. तिथे असतील माझे तेच सवंगडी; आतुरतेने माझी वाट पाहत असतील खेळ सुरू करण्यासाठी. अनेकांनी खिशात चिंचा, शेंगा, बोरं आणि अजून काय काय आणलं असेल. प्रेमानं देतील ते हातावर थोडंस त्यातलं.आणि मग आम्ही पुन्हा आमचा डाव सुरू करू चिरंतन आनंद देणारा........!
क्रमशः


Comments

  1. Incredible, Goosebumps,पूर्ण वाचलो ह्यातील खूप काही गोष्टी सगळ्यांच्या बालपणात होतात. पण तुम्ही जे वर्णन केलत ते अप्रतिम आणि अप्रतिम लेखन . Keep Continue....

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

जाऊ आनंदाच्या गावा - 2

जाऊ आनंदाच्या गावा - 1

जाऊ आनंदाच्या गावा - 9