जाऊ आनंदाच्या गावा - 4

माझं आजोळ

बालपणी सर्वात जास्त आवडती गोष्ट कुठली? तर ते म्हणजे आपल्या मामाच्या गावाला जाणे. प्रत्येकाला आतुरता असते ती आपल्या आजोळात जाऊन राहण्याची ;मामा, मावश्या, आजी ,आजोबा यांच्याकडून हट्टाने लाड पुरवून घेण्याची आणि मौजमजा करण्याची. जेवढा आनंद आपल्या आईला माहेरी आल्याचा होतो त्यापेक्षा कैकपटीने जास्त आनंद आपल्याला मामाच्या घरी आल्याचा होतो. काहींना आजोळ लांब असल्यामुळे वर्षातून एक दोनदा जायला संधी मिळते तर काहींना महिन्यातून एक दोनदा, पण माझ्या बालपणात मला तर रोजच आजोळी जायला मिळायचे कारण माझे आजोळ हे गावातच होते.

आमच्या मामाचे घर म्हणजे दगडा मातीच्या खुज्या भिंती आणि वरती छप्परावर कडुलिंबाचे वासे आणि सरमाडाच्या पेंढ्यानी शेकारलेलं गोठ्यावजा घर. ठिकठिकाणी अठराविश्व दारिद्र्याच्या खुणा जाणवतील असं मोडकंतोडकं संसारगाडगं आमची आजी मोठ्या कसरतीने चालवत होती.  समोरील अंगणात राम्या आणि लक्ष्या नावाची खिलारी बैलजोडी, एक गावरान म्हैस, घराची रखवाली करायला एक बंड्या नावाचा गुबगुबीत काळ्या रंगाचा कुत्रा, पाणईला टेकवलेली सायकल, गार कडुनिंबाच्या झाडाखाली टाकलेली लाकडी बाज आणि त्यावर अंथरलेली गोधडी. घरासमोरच शेती असल्यामुळे रानात डौलात उभी असलेली पिक असा मनाला आल्हाददायक आनंद देणारा नजारा माझ्या आजोळी असायचा. चार मामा असल्यामुळे प्रत्येक मामा आमच्यावर जीवापाड प्रेम करायचा, माझे प्रत्येक लाड पुरवण्यासाठी मामा कधीच कमी पडले नाहीत. सर्वात मोठे आंबूमामा मग दुसरे गोरक मामा, तिसरे हरीमामा आणि सर्वात लहान भक्ता मामा अशी चार चार मामा आम्हाला मिळाली होती.आम्ही लहान असल्यामुळे सर्वच मामांना अरेतुरे बोलत अगदी मामांचे लग्न होईपर्यंत!

सर्वात मोठा आंबू मामा! फार कष्टाळु पण तितकाच धाडसीही आणि भांडखोर त्यामुळे त्यांच्या भावकीत मोठ्या मामाला बाकीचे जरा घाबरूनच असत. पण भाचरांवर जीवापाड प्रेम करणारा आमचा मोठा मामा तितकाच मोकळ्या मनाचा उमदा गडी! उन्ह्याळ्याच्या दिवसात आंब्याच्या झाडावर चढून गरगरीत आणि रसरशीत आंब्याचे पिकलेले गोड गोड पाड आम्हाला मामा काढून द्यायचा अन कधी जवळ जर काही पैसे असतील तर पोंगे, लेमन गोळ्या घेऊन द्यायचा. मामाचा स्वभाव पहिल्यापासूनच फार मनमोकळा तो आजतागायत तसाच आहे!

दुसऱ्या नंबरचा गोरकमामा मात्र फार मितभाषी, कमी बोलणारा; बैलांच आणि शेतीच प्रचंड वेड असणारा तरुण शेतकरी! पावसाळ्यात गोरकमामाबरोबर लेंडीच्या डोहात बैल धुवायला जाणे हा माझा आवडता छंद! आणि मामासोबत गेल्यावर एखादे मोहोळ किंवा कंदमुळं खायला हमखास मिळणार म्हणजे मिळणारच! सुगीच्या दिवसात मोघडा-पाळी करताना मामा मला औतावर बसवी आणि मोठ्याने भलरी SSSS दादा SSSSSSS ओ भलरी SSSSSSम्हणे. मामाच्या पहाडी गाण्याचा आवाज अवघ्या शिवारात घुमायचा आणि बैलांनाही फार उत्साह यायचा, किडे खाण्यासाठी अंगावर बसलेल्या बगळ्याला झटकून लावत.. राम्या आणि लक्ष्या झपाझप पावलं टाकीत ओळीत काखऱ्या संपवायचे. 

तिसऱ्या नंबरचा हरीमामा मात्र फार तापट आणि चिडचिडा आणि सडपातळ बांधा असलेला हुशार कॉलेजकुमार! त्यावेळेस अजय देवगणची हेयर स्टाईल फार फेमस होती आणि आमच्या मामाला ती फार छानही दिसायची. मामाच्या रागीट स्वभावामुळं आम्ही जास्त त्याच्या जवळ जात नसत आणि त्याच्या कुठल्या वस्तूलाही हात लावत नसत. एकदा मी आणि माझ्या मित्राने दुपारची शाळा बुडवून बोरं खाताना आम्हाला मामाने पहिले आणि शाळेतल्या मास्तरांना सांगितले तेव्हा आम्हाला मास्तरांनी बेशरमीच्या फोकानी बदड बदड बडवले होते. तेव्हापासून आम्ही मामला जरा घाबरूनच राहत असत  आमच्या हरी मामला क्रिकेट खेळण्याच्या मात्र भारी नाद , त्यांच्या संघर्ष टीम मधला सगळ्यात चांगला बॉलर म्हणून मामा फेमस होता. 

सर्वात धाकटा आणि सर्व भाचरांचा लाडका म्हणजे भक्ता मामा! बलदंड शरीरयष्टी आणि कुस्त्यांचे फड गाजवणारा आमचा पहिलवान मामा !! त्याच्या आणि माझ्या वयात ५-६ वर्षाचा फरक असेल फार फार तर, त्यामुळे आमचं चांगलंच जमायचं. मळ्याच्या बरडावर मी आणि भक्तामामा तासनतास सायकलच्या गिरक्या मारायचो. मामाची सायकलही खूप छान सजवलेली होती. हॅन्डलला मऊ मुठी त्यातून ओवलेला गोंडा, चाकाला बांधलेली रंगीबेरंगी रिबन आणि बॅटरीवर चालणारा हॉर्न आणि मडगार्डवर रबराची कव्हर ! मामा फार हौसी त्यामुळे सायकलचीही तितकीच काळजीपूर्वक देखभाल करायचा. मला पहिल्यांदा सायकल शिकवली ती माझ्या भक्तामामानेच  ! माझे पाय पुरत नसल्यामुळे सुरुवातीला मधूनच सायकल चालवायला शिकलो, मी पडू नये म्हणून मामा मागे कॅरेजवर बसायचा आणि ऐनवेळी पाय टेकवायचा. त्यामुळे ज्यावेळी मामा सोबत असायचा त्यावेळी कधीच पडलो नाही.

शिवरातील ज्वारी - बाजरीच्या पिकात दाणे भरल्यावर पाखरांचे थवेच्या थवे पिकावर हल्लाबोल करायचे चिमण्या, पोपट, कबुतरे, पारवे असे अनेक पक्षी दाणे टिपण्यासाठी पिकामध्ये घुसायचे त्यामुळे भल्या सकाळी मामा हातात गोफण घेऊन पाखरांना हाकारण्यासाठी शेतातील मचाणावर उभे राहायचे आणि हातातील गोफण गोलगोल फिरवून आरोळ्या द्यायचे. गोफणीतून सुटलेल्या दगडामुळे आणि आरोळीमुळे आपल्या पंखाची फडफड करत तो पक्ष्यांचा तांडा या शेतातून त्या शेतात उडून जायचा. 

आमच्या मळ्यातील ज्वारीचं पीक 



आजोबा आणि सर्व मामा रानात गेलेले असल्यामुळे पाठीमागून त्यांचे दुपारचं जेवण घेऊन बाई (माझ्या आजीला आम्ही बाई म्हणतो) शेतावर जायची.  सोबत आम्हीही आजीच्या पाठीमागे हिरवीगर्द पायवाट तुडवत थेट शेतात जायचो.न्याहारीसाठी लोटक्यातलं बनवलेलं घट्ट दही, ताक, पातळ कालवण, खळगूट किंवा कारळ्याच्या मसाल्याचं कोड्यास , सोबत हिरव्या मिरचीचा ठेचा, किंवा पाट्यावर वाटलेली डाळलसणाची चटणी आणि ज्वारीच्या किंवा बाजरीच्या भाकरी एका स्वच्छ कापडाच्या फडक्यात बांधून हे सर्व एका वेताच्या पाटीत मांडायचे आणि ती पाटी डोक्यावर घेऊन रानात जायचं.  दुपारी सूर्य माथ्यावर आल्यावर मग शेतात बांधावर बसून एखाद्या झाडाखाली जेवायचं शेतातील कांदापाथ, किंवा करडई/ मेथीची पालेभाजी हे शेतकऱ्याचं सॅलडच, तेही अगदी ताजं !!पोटभर जेवल्यावर थोडंसं तिथंच आंब्याच्या झाडाखाली गर्द सावलीत आडवं व्हायच अगदी उन्हं उतरेस्तोवर ! कुठल्याही घडीच्या काट्याला न बांधलेलं जीवन अगदी निवांत..., शांत...., ताणतणाव तर औषधाला सुद्धा नाही.

माझे आजोबा उत्तम पखवाजवादकआणि महिन्याचे पंढरीचे वारकरी, प.पूज्य वामनभाऊंचे शिष्य असल्यामुळे त्यांना गावातही खूप चांगला मान होता. खांद्यावर भगवी पताका काखेत शबनम बॅग डोक्यावर केशरी फेटा कपाळी गोपीचंदाचा उभा गंध रेखाटलेला आणि त्यामध्ये अष्टगंध आणि बुक्याचें दोन गोलाकार ठिपके.सिंदफणाकाठीअसलेल्या सिद्धेश्वराच्या मंदिरातील गाभाऱ्याप्रमाणे शांत आणि पवित्र मुद्रा! मुखात पांडुरंगाचे नाम आणि पखवाजावर थाप टाकली की सोबत असणारी वारकरी मंडळी भान हरपून जायची! आम्ही माझ्या आजोबांना दादा म्हणत असू . दादा पंढरपूरच्या वारीतून यायची आम्ही खूप वाट पाहायचो कारण येताना ते बत्ताशे आणि साखरफुटाण्याचा प्रसाद आणायचे आणि आम्हा नातवांडाला अगदी मन तृप्त होईपर्यंत खाऊ घालायचे. त्यांचं उभ्या हयातीत कधीही कुणाशी कसलं भांडण नाही की मतभेद नाही. अनेक अभंग अगदी मुखोद्गत पाठ त्यामुळे आजोबांना गावाच्या भजनी मंडळीत सर्वजण गुरुस्थानी मानायचे. कधीकधी दादा आम्हाला गूळ शेंगदाण्याच्या प्रसादाचं आमिष दाखवून त्यांच्या सोबत हनुमंताच्या देवळात सायंकाळी हरिपाठाला न्यायचे. मच्छिन्द्राने .... बोध ... गोरक्षासी केला.....  या अभंगानंतर टाळमृदूंगाच्या तालावर फेर धरत गावातील मचू काका आणि आमचे चुलते ज्ञानदेव नाना यांच्यात रंगलेली फुगडी अविस्मरनियच असायची ......... !! 

दादांची फार इच्छा होती की मी प्रसिद्ध कीर्तनकार बनावं पंढरीची वारी करावी, जेव्हा मी भगवानगडाच्या नारळी सप्ताहात पहिलं प्रवचन केलं होतं तेव्हा माझ्या आजोबांनी प्रेमाने मांडीवर घेऊन माझं तोंड भरून कौतुक केलं. होतं आणि दिसेल त्याला माझे कौतुक सांगायला दादा विसरायचे नाहीत. त्यानंतर दादांनी मला सन्मानाने अहोजाहो बोलायला सुरुवात केली पण मला ते फार अवघडल्यासारखे वाटे. पुढे दादांना मणक्याच्या असाध्य आजाराने ग्रासले आणि त्यातच त्यांना मृत्यूने गाठले! दादांची आजही आठवण आली की, डोळ्यांच्या कडा ओलावतात. 

किती गोड पिढी होती त्यांची! एकमेकांबद्दल प्रचंड माया असायची, नात्यातला गोडवा जपणारी माणसं होती ती. पैसे कमावण्यापेक्षा शरीरसंपदा आणि प्रेमाची माणसं कमावण्याला प्राधान्य देणारी ती पिढीच आता लोप पावलीय. आता उरलीय फक्त दुर्बल मनाच्या आणि रोगट शरीरांच्या पिढीची जीवघेणी स्पर्धा.... !! हातात मोबाईल फोन आले इंटरनेट आलं पण संवाद हरवला. इन्स्टंट जमान्यात नात्यातला ओलावाही इन्स्टंट संपत चाललायं. भावाबहिणीचं प्रेमळ नातं हरवत चाललंय आणि त्याची जागा आता वडिलोपार्जित जमिनीचे वाद आणि कोर्टकचेऱ्यानी घेतली. व्हाट्सपवर दिवाळीचे संदेश देणाऱ्या मामापेक्षा, भाच्यांसाठी सायकलवर पिशवीत फटाके घेऊन येणारा मामाच मला जास्त आठवणीतला वाटतो.

खरंच खूप सुंदर होतं माझं आजोळ अगदी भरलेल्या गोकुळासारखं  ......  आणि आजोळ म्हणजे प्रत्येकाच्या बालपणातला सर्वार्थाने रोमहर्षक काळ नाही का ?

क्रमशः


भलरी दादा भलरी  ......... 






Comments

Post a Comment

Popular posts from this blog

जाऊ आनंदाच्या गावा - 2

जाऊ आनंदाच्या गावा - 1

जाऊ आनंदाच्या गावा - 9