जाऊ आनंदाच्या गावा - 9
गावगाडा भारतात ग्रामीण संस्कृती जितकी समृद्ध होती तितकी कुठल्याच देशात बहुधा नसावी किंबहुना नव्हतीच इतरत्र. ज्यावेळी पाश्चिमात्य देशात रानटी संस्कृती जोर धरत होती त्यावेळी हिंदुस्थानातील गावे वेदघोषाने जागी व्हायची आणि कीर्तनाने आत्मतृप्त होऊन निद्राधीन व्हायची. स्वयंपूर्ण खेडी, कृषी आधारित अर्थव्यवस्था आणि बाराबलुते अठरापगडजातींनी भरलेले गाव, कित्येक चांगल्या वाईट परंपरा इथे जन्माला आल्या नंतर काही लुप्त झाल्या आणि काही टिकल्याही. त्यातल्या त्यात पूर्वीचे निबिड अभयारण्य आणि सध्याच्या मराठवाड्यात तर सतत आक्रमणं,लढाया अगदी कृष्ण देवरायापासून किंवा शालिवहनाच्या शासनकाळापासून ते अलीकडील मराठे, निजाम आणि नंतर स्वतंत्र भारत या सर्व संक्रमणाच्या काळात मराठवाड्याच्या ग्रामीण संस्कृतीवर मोठा परिणाम पाहायला मिळतो. या सर्व कठीण, अतिकठीण किंवा सुकर काळात आमच्या गावानेही अनेक प्रसंग आपल्या पोटात सामावून घेतले पण आम्हाला मोजकेच माहित आहेत एवढंच. पूर्वीचे आनंदगाव म्हणजे बहुतेक २०० वर्षांपूर्वी नक्की काळ सांगता येणार नाही पण जुन्या जाणत्या माणसाकडून ऐकायला मिळाले त्...